Sangli Road Accident: सांगली जिल्ह्यातील जत मार्गावर क्रुझर आणि लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झाले तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार ते पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विजयपूर-गुहागर महामार्गावर हा अपघात घडला आहे. सांगली जिल्ह्यातील जतवरुन येणाऱ्या जत-मुंबई लक्झरी बसला क्रुझरने धडक दिली. या जीपमधून लग्नाचे वऱ्हाड (14 ते 15 जण) प्रवास करत होते. जत मार्गावरुन जात असताना चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटल्याने जीप लक्झरी बसला जाऊन धडकली.
ही धडक इतकी भीषण होती की, क्रुझर जीपच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. त्यामुळे चालकासहित पुढच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित लोक गंभीररित्या जखमी झाले. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. क्रुझरमधील सर्वजण सावर्डेकडे लग्नसमारंभासाठी जात होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. दरम्यान, मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.