शौचालयाच्या नावाने नागरिकांची क्रूर थट्टा !

कररूपी पैशाची चुकीच्या माहिती फलकाने उधळपट्टी

पुणे : बिबवेवाडी – महर्षीनगर झांजले पथ येथे सौभाग्य मंगल कार्यालयासमोर ‘शौचालय पुढे १०० मीटर वर’ असा बाण दाखवून माहिती फलक लावण्यात आला आहे. त्या दिशेने पुढे १०० मीटर अंतर गेल्यावर पुन्हा विरुद्ध दिशेने बाण दाखवून १०० मीटर अंतरावर शौचालय असा माहिती फलक लावण्यात आला आहे. मात्र दोन्हीकडे शौचालय अस्तित्वात नाही.

पदपथ बंद करून उभारलेले वाचनालय , एलईडी चे बंद पडलेले पदपथ, लाखो रुपये उधळपट्टी करून चमकोगिरी करत रंगविलेल्या भिंती, जागोजागी माननीयांच्या नावाचे माहिती फलक हे पराक्रम कमी म्हणून आता महानगपालिका बिबवेवाडी कार्यालयाकडून शौचालयाचे फक्त माहिती फलक लावून क्रूर थट्टा करण्यात आली आहे. नागरिकांच्या कररूपी पैशातून माहिती फलक लावताना लक्ष न दिल्याने  नागरिकांची मात्र फलक वाचून पुढे शौचालय शोधण्यात गोंधळल्याची अवस्था होते.

परिसरात नागरिकांना रस्ते, मलवाहिनी, कमी दाबाने येणारे पाणी, कचरा अशा विविध समस्या भेडसावत असताना महानगरपालिका चे अधिकारी यांनी शुद्धीत विकास कामे करावी अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी दैनिक प्रभात कडे व्यक्त केली.

महिलांना स्वतंत्र शौचालय द्या…

महर्षी नगर, मुकुंद नगर इतक्या मोठ्या परिसरात महिलांना साठी एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांची कुचंबणा होत असल्याची तक्रार महिलांनी केली असून याबाबत तक्रारी करूनही शौचालय उभारत नसल्याने  दै. प्रभात ने पाठपुरावा करावा अशी मागणी स्थानिक महिलांनी केली आहे.

‘सदर चुकीचे माहिती फलक कोणी लावले याबाबत माहिती घेण्यात येईल. सदर चुकीचे माहिती फलक तातडीने काढण्यात येतील.’

– अजय खामकर ,कनिष्ठ अभियंता बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.