तेरी मेरी यारी… माझाच खिसा रिकामा करी! मैत्रीणीचे ‘ट्राफिक चलन’ भरणे मैत्रीणीला पडतंय महागात

पुणे – मैत्रीणीच्या दुचाकीने केलेल्या वाहतूक नियमभंगाचा दंड भरण्यासाठी स्वत:चे एटीएम कार्ड आणि मोबाईल क्रमांक पोलिसांना देणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. दंड भरल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी संबधित वाहनाशी पोलिसांनी सलंग्न केल्याने आता प्रत्येक नियमभंगाचे चलनाची पावती या महिलेच्या नावे फाडली जात असल्याने मदत करणाऱ्या मैत्रिणीलाच भूर्दंड सहन लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, ही बाब निदर्शनास आल्यानंतर संबधित महिलेकडून संबधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे अजब उत्तर देण्यात आले.

विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते. मागील काही वर्षांपासून विविध चौकांमध्ये होणाऱ्या कारवाई व्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेराद्वारे देखील कारवाई करण्यात येत असून, संबंधितांच्या मोबाईलवर ई-चलन पाठवण्यात येते. तर अधिक प्रलंबित दंडावर खटला देखील दाखल करण्यात येतो.

यादरम्यान, एका व्यक्तीचे चलन दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने येण्याचे प्रकार देखील घडतात. मात्र पुण्यातील एका मैत्रिणीला दुसऱ्या मैत्रिणीच्या वाहनावरील दंड चुकवणे भारी पडले असून, आता सातत्याने नियमांचे उल्लंघन केलेल्या मैत्रिणीचे चलन ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या मैत्रिणीच्या नावे येत आहे.

संबधित महिलेने डिसेंबर 2018 मध्ये अलंकार पोलीस चौकीच्या परिसरात आपल्या मैत्रीनीने केलेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचा दंड मैत्रीत भरला. हा दंड एटीएम कार्डद्वारे भरण्यात आल्याने, पोलिसांनी या वेळी संबधित महिलेचा मोबाईल क्रमांक मैत्रीणीच्या वाहनाशी पोलिसांनी “रजिस्टर’ केला. त्यामुळे संबधित वाहनाशी या मैत्रीणीचा मोबाईल क्रमांक सलंग्न झाल्याने प्रत्येक वेळी संबधित वाहनाकडून वाहतूक नियमभंग झाल्यानंतर मदत करणाऱ्या मैत्रिणीच्या मोबाईल क्रमांकावरच दंडाची पावती येत आहे. गेल्या दोन वर्षात दोन वेळा दंडाच्या पावत्या आलेल्या आहेत. त्यामुळे, न केलेल्या चुकीसाठी दंड अंगावर पड्‌त असल्याने मदत करणारी महिला चांगलीच संतापली आहे.

इकडे नको तिकडं जा…

दरम्यान, या प्रकारानंतर दंड आकारण्यात येत असलेल्या मैत्रिणीने वाहतूक विभागाशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. मात्र, पोलिसांकडून मदत करण्या ऐवजी संबधित महिलेस तुम्ही आरटीओ कार्यालयात जा आणि तिथे तुमची तक्रार करा असे सुनावले, प्रत्यक्षात संबधित वाहनाशी पोलिसांनी मोबाईल क्रमांक वाहनाशी संलग्न केला आहे. त्यामुळे ही सरळ सरळ पोलिसांची चूक असताना मनस्ताप मात्र, संबधित महिलेला सहन करावा लागत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.