नवी दिल्ली – अदानी उद्योग समुहाला सरकारी मालकीच्या एनटीपीसी या वीज उत्त्पादन करणाऱ्या कंपनीला कोळसा पुरवठ्याचे सर्वात मोठे कंत्राट दिले गेले आहे. हा उद्योग समुह एनटीपीसीला एक दशलक्ष टन कोळसा पुरवणार आहे.
हा उद्योग समुह विदेशातून मोठ्या प्रमाणात कोळसा आयात करतो. हा आयात कोळसा पुरवण्यासाठीचे हे कंत्राट आहे. या कराराचा अन्य तपशील मात्र जाहीर झालेला नाही. कोलकाता येथील दामोदर व्हॅली या आणखी एका कंपनीलाही अदानी उद्योग समुहाकडूनच कोळसा पुरवला जाणार आहे. त्याचे प्रमाणही एक दशलक्ष टन इतकेच असणार आहे.
या कराराच्या संबंधात दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून प्रसार माध्यमांनी तपशील मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना या दोन्ही कंपन्यांकडून प्रतिसाद मिळू शकलेला नाही.