नगर – पेट्रोल पंप आणि सराफ बाजारात सध्या 2 हजार रुपयांची नोट घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नगर शहरात तर 50 ते 100 रुपयांचे पेट्रोल भरण्यासाठीही थेट 2 हजार रुपयांची नोट दिली जात असल्याने त्रस्त पंपचालकांनी किमान 500 व त्याच्या पटीत इंधन खरेदी केले तरच 2 हजारांची नोट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
किरकोळ खरेदीसाठी 2 हजार नोट स्वीकारली जाणार नसल्याची जाहीर भूमिका घेत तसे फलकच प्रत्येक पंपावर लावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे जवळपास सर्वच पेट्रोल पंपांवर एरवी दिवसभरात 2 हजार रुपयांच्या 6 ते 7 नोटा येत असत परंतु गेल्या दोन दिवसांपासून त्यात वाढ झाली आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्याने रिअल इस्टेटमध्ये दोन हजारांच्या नोटा देण्याकडे कल वाढला आहे. अगोदर आमचे पैसे घ्या, नोटरी, रजिस्ट्रीचे नंतर बघू, असेही काही ग्राहक बिल्डरांना सांगत आहेत. यामुळे दोन हजार रुपयांच्या नोटांच्या एन्ट्रीने रिअल इस्टेटमधील व्यवहाराला गती आली आहे.