#CWC2019 : लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर प्रसारमाध्यमांकडून ऑस्ट्रेलियावर टीका

सिडनी – विश्‍वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीत इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर येथील प्रसारमाध्यमांनी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू व सपोर्ट स्टाफवर कडाडून टीका केली आहे. विश्‍वचषक पाच वेळा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा एवढा दारुण पराभव अनेकांसाठी अनपेक्षित आहे. साखळी गटात त्यांना भारत व दक्षिण आफ्रिका यांनी हरविले होते. मात्र, या पराभवानंतर येथील प्रसारमाध्यमांनी खूप टीका केली नव्हती. आता मात्र ऑस्ट्रेलियाचे आव्हानच संपल्यानंतर येथील वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांनी खेळाडू आणि संघातील अन्य जबाबदार व्यक्‍तींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

येथील ख्यातनाम स्तंभलेखक जॉन पेरिक यांनी म्हटले आहे की, उपांत्य फेरीसाठी सराव सत्राचे वेळी शॉन मार्श व ग्लेन मॅक्‍सवेल यांना दुखापती झाल्या होत्या. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. खेळाडू शंभर टक्‍के तंदुरूस्त नसतील तर त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होत नाही हे संघ व्यवस्थापनाकडून सोयीस्कररित्या विसरले गेले आणि त्याचीच मोठी किंमत त्यांना पराभवाद्वारे मोजावी लागली आहे. उस्मान ख्वाजा यास साखळी सामन्यात दुखापत झाली व त्याला स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागली. खरंतर त्याचवेळी संघव्यवस्थापनाने खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत योग्य काळजी घेण्याची गरज होती. मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाचे समीक्षक जिऑफ लेमन यांनी म्हटले आहे की, इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे आमचे प्रमुख फलंदाज सपशेल निष्प्रभ ठरले. तेथेच आमच्या हातातून सामना गेला होता. पहिली फळी अपयशी झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ व अन्य फलंदाजांनी थोडेफार प्रयत्न केले होते. मात्र, तोपर्यंत इंग्लंडची बाजू भक्कम झाली होती. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे की, इंग्लंडचा संघ बाद फेरीत ढेपाळतो अशाच भ्रमात आमचे खेळाडू होते. त्यामुळेच आमच्या खेळाडूंना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.