काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा वाढणार? विधानसभा निवडणूकीसाठी वचिंत आघाडी एक पाऊल पुढे

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने पूर्ण तयारी केली असून, राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांत लढण्याची तयारी आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 21 जून रोजी पत्रकारांशी बोलताना दर्शवली होती. तसेच ‘वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जुलै अखेर जाहीर करण्यात येईल असं सांगितल होतं. त्याचदृष्टीने वंचित बहुजन आघाडीने विधानसभेत स्वबळावर तयारी सुरु केली आहे. राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 288 जागांसाठी वंचित बहुजन आघाडीने नागपूरातून इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्याने महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभेत स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केल्याने राज्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार आहे. तसेच वंचित आघाडीकडून लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये इतर पक्षातील नेते व कार्यकर्त्यांच्याही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आजपासून इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती सुरू केल्या असून या मुलाखतीच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार विदर्भात 13, 14 आणि 15 जुलै रोजी उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

दरम्यान, वंचितने याअगोदर काँग्रेसला फक्त 40 जागांची ऑफर दिली होती. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीला आपल्या सोबत घ्यावं, अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यासंदर्भात विधानसभा निवडणुकीत वंचितने आघाडीत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत,अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी मांडली होती.

पण, वंचितने फक्त 40 जागांची ऑफर देऊन आघाडीमध्ये जाण्याबाबतची भूमिका अप्रत्यक्षपणे स्पष्ट केल्याचं बोललं जातंय. त्यातच सर्व जागांसाठी मुलाखती म्हणजे लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही वंचितेन स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

काँग्रेसच्या प्रतिसादाची कोणतीही वाट न पाहता वंचितने विदर्भातील सर्व जागांच्या मुलाखतीचं आयोजन केलंय. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट असून काँग्रेस पक्ष व इतर त्याचे मित्रपक्ष काय पाऊल उचलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.