न्यूयॉर्क – कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे अजूनही नर्व्हस, कोणताही ठोस गुण नसलेले विद्यार्थीच आहेत, अशा शब्दात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांचे वर्णन केले आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकांवर प्रभाव टाकायचा असतो. मात्र त्यामध्ये टाकण्याची गुणवत्ता आणि कोणत्याही विषयातील तज्ञ होण्याची तीव्र इच्छा नसते, तसेच राहुल गांधी यांचे व्यक्तिमत्व असल्याचे ओबामा यांनी “अ प्रोमिस्ड लॅन्ड’ या आपल्या पुस्तकात म्हटले असल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या पुस्तक परिचयामध्ये म्हटले आहे. या पुस्तकात ओबामा यांनी भारतीय राजकीय नेत्यांबरोबरच जागतिक पातळीवरील अन्य नेत्यांबाबतही खुलेपणाने आपले मत मांडले आहे.
बिहारमध्ये राजकीय ‘भूकंप’ होणार; संजय राऊत यांचे भाकीत
राहुल गांधी यांच्या मातोश्री आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही उल्लेख ओबामा यांच्या पुस्तकात आहे. आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि राहम एमॅन्युएल यासारख्या देखण्या व्यक्तींबाबत सांगितले जात असे. मात्र एखाद दुसरे उदाहरण सोडले तर महिलांबाबत सांगितले जात नसे. अशा अपवादातील महिलांमध्ये सोनिया गांधी यांचा समावेश होतो.
अनेरिकेचे माजी संरक्षण मंत्री बॉब गेट्स आणि भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे दोघेही शांत, प्रामाणिकपणाबाबत सारखेच आहेत. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन हे कठोर वृत्तीचे, सहकाऱ्यांचा चांगला उपयोग करून घेण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे आणि अतुलनीय शारीरिक क्षमता असलेले आहेत, असे ओबामा यांनी म्हटले आहे.
ओबामा यांचे हे पुस्तक 17 नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे. त्यामध्ये ओबामा यांचे बालपण आणि राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळाचाही आढावा असेल. विशेषतः 2008 साली अध्यक्षपदाच्या प्रचाराच्या काळापर्यंतच्या कालखंडाचा या पुस्तकात आलेख असेल. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन वंशाचे अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्ष असताना 2010 आणि 2015 साली भारताला भेट दिली होती.