अमरावती – बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराला “रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. जगातील जैवविविधतेने महत्त्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय “रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात येतो. लोणार अभयारण्य हे महाराष्ट्रातून घोषित झालेले दुसरे “रामसर’ स्थळ ठरले आहे.
इराणमधील रामसर शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी पाणथळ संवर्धनासंदर्भात ठराव करण्यात आलेला आहे. या ठरावाची 1975 पासून अंमलबजावणी करण्यात येते. भारताने 1982पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे.
बिहारमध्ये राजकीय ‘भूकंप’ होणार; संजय राऊत यांचे भाकीत
आतापर्यंत जगात 2200 पाणथळ स्थळ असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. “रामसर’ संकेतस्थळावर 11 नोव्हेंबर 2020 रोजी घोषित करण्यात आलेल्या पाणथळ स्थळाच्या यादीत भारतातील दोन स्थळांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
यात उत्तर प्रदेशातील आग्रा येथील केथमलेक सरोवर आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा समावेश आहे. सध्या लोणार खाऱ्या पाण्याचे तळे हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. लोणार सरोवराला “रामसर’ पाणथळ स्थळ घोषित झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वनमंत्री संजय राठोड यांनी ट्विट करून वनखात्याचे कौतुक केले.
लोणार अभयारण्य हे 8 जून 2000 साली निर्माण करण्यात आले. 365.16 हेक्टर परिसरात एवढे क्षेत्र असून, 77.69 हेक्टर परिसरात खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हे सरोवर जागतिक कीर्तीचे ठरले आहे. “रासमर’ पाणथळ स्थळ घोषित झाल्यामुळे जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय करार होण्याची दाट शक्यता आहे.