पुणे – जीवाच्या भितीपोटी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून एख पिस्तूल व तीन जीवंत काडतूसे असा 63 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्या विरुध्द आर्म ऍक्ट अंतर्गत समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अनिकेत राजेंद्र लांडे(21,रा.मादगुडेवाडी, भोर) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हे शाखा युनिट एकचे पथक सराईत गुन्हेगारांची तपासणी करत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना भवानी पेठेत थांबल्याची खबर मिळाली. तो एका पंक्चरच्या दुकाना शेजारी उभा असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याचेही खबऱ्याने सांगितले. त्यानूसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून लांडेला ताब्यात घेण्यात आले.
त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, कंबरेला खोचलेले पिस्तूल व पॅंण्टच्या खिशात तीन काडतूसे सापडली. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने तीन वर्षापुर्वी एकाच्या खुनाचा प्रयत्न केला होता. त्याच्यापासून जीवाला भिती असल्याने पिस्तूल बाळगल्याचे सांगितले.
लांडेवर खुनाच्या प्रयत्नाचे दोन व मारामारीचा एक असे तीन गुन्हे मार्केटयार्ड, बिबवेवाडी आणी हवेली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याला न्यायालयात हजर केले असता 19 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने केली.