पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मार्केट यार्डातील फळबाजारात ट्रकचालकाला चाकूच्या धाकाने लुटणार्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. प्रकाश ऊर्फ पक्या देवराम परिहार (रा. राम मंदिराजवळ, लोहियाननगर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
याबाबत किशोर भागचंद रोमण (३१ , रा. पोवळवाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमण मार्केट यार्डातील फळबाजारात शेतीमाल घेऊन आले होते.
केळी बाजारात त्यांनी ट्रक लावला असता, परिहारने रोमण यांना चाकूचा धाक दाखविला, तसेच त्यांच्या खिशातील मोबाईल आणि रोकड असा २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. पोलिसांकडे तक्रार दिल्यास तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला. या घटनेची माहिती रोमण यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी परिहारला ताब्यात घेतले असून, तो सराईत चोरटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.