शिक्रापूर -कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जमीन बांधकाम करीत विकसित करण्यासाठी घेऊन जमीन मालकाच्या परस्पर जमिनीवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढून जमीन मालकाची फसवणूक केली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तनवीर जेनुद्दिन मोमीन (रा. मांजरी, हडपसर) व सुभाष श्रीहरी दहिफळे (रा. पुणे) या दोघा बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बाबासाहेब जासूद (रा. विमाननगर, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.
कोरेगाव भीमा येथे बाबासाहेब जासूद यांची जमीन आहे. त्यांनी ही जमीन तनवीर मोमीन व सुभाष दहिफळे या दोघा बिल्डरांच्या कुबेर प्रॉपर्टी कंपनीला विकसित करण्यासाठी देऊ केली होती. जमीन विकसित केल्यानंतर इमारतीपैकी सत्तर टक्के बिल्डरांना तर तीस टक्के बाबासाहेब जासूद यांना देण्याचे ठरले होते.
याबाबत तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालय येथे 2017 मध्ये करारनामा नोंदणी देखील केली होती. दोघा बिल्डरांनी कुबेर प्रॉपर्टी कंपनीच्या नावाने याठिकाणी बिल्डींग उभी करण्यासाठी कर्ज काढायचे म्हणून शिवाजीनगर पुणे येथील बॅंक ऑफ इंडियाला काही बनावट कागदपत्रे देऊन बॅंकेतून तब्बल पाच कोटी पंचवीस लाख रुपये कर्ज काढून घेतले.
दरम्यान, बॅंकेच्या व्यवस्थापकाकडून जागा मालक जासूद यांना कोणत्याही प्रकारची विचारणा केली नाही. मात्र, दोघा बिल्डरांनी कुबेर कंपनीच्या नावाने जासूद यांची जमीन विकसित करण्यासाठी त्यांच्या जमिनीबाबत खोटे कागदपत्र देऊन काढलेले कर्ज दुसरीकडे वापरुन जासून यांची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे हे करीत आहेत.