पुणे – नामांकित कंपन्यांचे बनावट पेंट विकणाऱ्या दोघांवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 60 हजार रुपयांचे बनावट पेंट हस्तगत करण्यात आले आहेत.
संजय रामप्रित सहाणी(37, रा.तपोधाम, वारजे) व नरेश गोयल (रा.दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एशियन पेंटच्या वतीने आनंद राधेशाम प्रसाद (24,रा.दिल्ली) यांनी फिर्याद दिली आहे.
संजय सहाणी याचे कर्वेनगर येथे शुभम सेल ऍण्ड डिस्ट्रीब्युटर नावाचा व्यवसाय आहे. तर नरेश गोयल याने एशियन पेंट व इतर कंपन्यांचे बनावट पेंट तयार करुन विक्रीसाठी सहाणी याला दिले होते. दोघे मिळून हा बनावट पेंट विक्रीचा व्यवसाय करत होते. हे काम एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये सुरु होते. दरम्यान एशियन पेंट कंपनीला त्यांचा बनावट माल विक्री होत असल्याची खबर मिळाली होती.
त्यानूसार कंपनीच्या वतीने आनंद प्रसाद यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकल्यावर त्यांना बनावट पेंटचा 81 हजार 400 रुपयांचा माल सापडला. यानंतर गोडाऊनचा छडा लावल्यावर तेथे 8 लाख 97 हजार रुपयांचा बनावट माल सापडला.
नामांकित कंपन्यांच्या नावाच्या डब्यांमध्ये गोडाऊनमध्ये तयार केलेले बनावट पेंट भरुन त्याची विक्री केली जात होती. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले करत आहेत.