उरुळी कांचन, (वार्ताहर)- नववीत शिक्षण घेत असलेल्या शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणार्या आरोपीवर उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 14) संध्याकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश दिलीप बडेकर (वय 19, रा. तुपेवस्ती उरूळी कांचन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी 15 वर्षीय पीडित मुलीच्या आईने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी ही उरुळी कांचन येथील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. पीडित मुलगी महात्मा गांधी विद्यालयाच्या रस्त्यावरून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे. दरम्यान, आरोपीने पीडित मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
तसेच आरोपीने तिचा घरापर्यंत पाठलाग करून विनयभंग केला, अशी फिर्याद पीडित मुलीच्या आईने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, आरोपी दिनेश बडेकर याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.