वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – शेतात ज्वारी काढण्यासाठी गेलेल्या भगवान मच्छिंद्र सपकाळ (वय 24, रा. पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव) याचा डोक्यावर आणि तोंडावर खलबत्त्याच्या ठोंब्याने घाव घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास उघडकीस आली. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पिंपोडे बुद्रुकच्या उत्तरेला दोन किलोमीटरवर परगणा वस्ती आहे. या वस्तीच्या अलीकडे नव्याने बांधलेल्या श्री घुमाईदेवी मंदिरापासून हाकेच्या अंतरावरील मळा नावाच्या शिवारात भगवान सपकाळ हा काल (दि. 15) पासून ज्वारीची काढणी करत होता. तो शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास एकटाच शेतात गेला होता. त्याची आई जेवणाचा डबा घेऊन दुपारी 12 वाजता शेतात गेली असता, भगवानचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.
या घटनेची बातमी सर्वत्र पसरली. सातारा येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक एम. डी. शिंदे आणि वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे हे कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सातार्याहून ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी श्वानाला शेतात पडलेल्या खलबत्त्याच्या ठोंब्याचा वास देऊन मारेकर्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वान परगणा वस्तीपर्यंत जाऊन घुटमळले. भगवान हा गरीब कुटुंबातील मुलगा होता. त्याचे वडील मच्छिंद्र आणि आई शेती व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात.
भगवान हा लहान भाऊ अभिजित याच्यासह शेतीकामात त्यांना मदत करत होता. भगवानने गावातील खासगी दवाखान्यात मदतनीस म्हणून काम केले होते. पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर, भगवानवर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्याची आई सौ. लक्ष्मी सपकाळ (वय 40) यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. सपोनि अशोक हुलगे तपास करत आहेत.