सातारा – करोनाबाधित युवकाबद्दल चुकीची बातमी प्रसिद्ध करून समाजात गैरसमज पसरवल्याच्या आरोपावरून “ऑसम इन्फो’ या यूट्युब चॅनेलवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या अभियंता तरुणाने ईमेलद्वारे तक्रार दिली आहे.
सातारा तालुक्यातील एका गावात एक तरुण परदेशातून 19 मार्चला आला होता. त्याला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्याची 3 एप्रिल रोजी तपासणी झाली असता, तो करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.
या दरम्यान तो तरुण कोणाच्याही संर्पकात आला नव्हता. उपचारानंतर त्याचा अहवाल 20 मे रोजी निगेटिव्ह आला तरी खबरदारी म्हणून त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते; परंतु “ऑसम इन्फो’ या यूट्युब चॅनेलवरून प्रसिद्ध झालेल्या बातमीत संबंधित तरुण बाधित असल्याचे आणि तो नागठाणे परिसरात फिरल्याचे म्हटले होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या बातमीद्वारे समाजात अफवा पसरवून बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.