पुणे – शहरात गुरुवारी दिवसभरात 318 नवीन बाधित सापडले. दिवसभरात 205 जणांना घरी सोडल्याने दिलासा मिळाला.
मागील दोन दिवसांत साधारण 2 हजार व्यक्तींच्या नमुने तपासणी अहवालात 318 हे बाधित रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. यामध्ये नायडू रुग्णालयात 236 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, ससूनमधील 11 आणि खासगी रुग्णालयातील 71 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 315 जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले. 205 जणांना गुरुवारी डिस्चार्ज मिळाला. एकूण 3 हजार 264 जणांना घरी सोडले आहे.
150 व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 49 जणांना व्हेंटिलेटर लावला आहे. तर 101 व्यक्तींना अतिदक्षता विभागात ठेवले आहे. एकूण 2 हजार 294 करोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आणखी दहा मृत्यू
गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दि. 25 मे रोजी एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल समोर आला. त्यामध्ये 5 महिला व 5 पुरुषांचा समावेश आहे. सर्व व्यक्ती 45 ते 75 या वयोगटांतील आहे. वडारवाडी, हडपसर, पर्वती, बोपोडी, येरवडा, नाना पेठ, कोंढवा या परिसरातील हे व्यक्ती असून, यातील काहींची जुन्या आजाराची हिस्ट्री आहे.