नाशिक : महाराष्ट्र पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण क्षमतेत गुणात्मक वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक नवीन प्रशासकीय इमारत, वसतीगृह, भोजनालय संकुलाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते संपन्न झाले. त्यावेळी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार हिरामण खोसकर, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालिका अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य अशोक नखाते आणि आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, या नवीन इमारतीच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या दर्जात, गुणवत्तेत, क्षमतेत वाढ होईल, पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण संदर्भातल्या ज्ञान, अनुभव, कौशल्यात भर पडेल, राज्यातील गुन्हे नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास याचा फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
साडेसात कोटी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत, 11 कोटी रुपये खर्चून वसतीगृह इमारत आणि अडीच कोटी रुपये खर्चाचं भोजनालय, सुमारे 21 कोटी रुपये खर्चून हे गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचं नवीन संकूल, नाशिकमध्ये उभं राहिलं आहे. एका वेळी 200 पोलिसांना प्रशिक्षण देऊ शकणाऱ्या या वास्तूचं लोकार्पण ही महाराष्ट्र पोलिसांसाठी आनंदाची, अभिमानाची, गौरवाची बाब आहे. प्रशिक्षण विद्यालयाच्या या नवीन इमारतीच्या उभारणीत सहकार्य, योगदान दिलेल्या सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित सर्वांचं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.
संस्थेची कामगिरी कौतुकास्पद
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, 1981 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून पोलिस अंमलदारांना गुन्ह्यांच्या तपासाचं शास्त्रोक्त, अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येतं. एफआयआर नोंदवण्यापासून चार्जशीट दाखल करण्यापर्यंतची प्रक्रिया याठिकाणी शिकवली जाते. आतापर्यंत 385 प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून 25 हजार पोलिस अंमलदारांना गुन्हे तपासाचं पायाभूत प्रशिक्षण देण्यात आलं. तर, 293 प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून 25 हजार पोलीस अंमलदारांना, 12 प्रकारच्या गुन्हे तपासासाठी विशेष प्रशिक्षित करण्यात आलं. कोविड काळात 93 सत्रांच्या माध्यमातून साडे सहा हजार अंमलदारांना इथून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलं. 2009 मध्ये विद्यालयाला गुणवत्तेचं आयएसओ मानांकनही मिळालं आहे. संस्थेची ही कामगिरी निश्चितंचं कौतुकास्पद आहे, असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.