अहमदाबाद – गुजरात कॉंग्रेसचे नेते कैलाश गढवी यांनी रविवारी येथे आम आदमी पक्षात प्रवेश केला. सत्तेच्या नशेत चूर असलेल्या भाजपशी आपला लढा सुरूच राहील असेही त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे माजी प्रवक्ते असलेल्या गढवी यांनी आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर एका दिवसात 300 कॉंग्रेस कार्यकर्त्यांसमवेत आम आदमी पक्षात प्रवेश केला.
गढवी म्हणाले की, गुजरातमधील बीजेपी सरकार आरोग्य आणि शिक्षण सुविधा तसेच लोकांना सुरक्षा आणि नोकऱ्या देण्यात अयशस्वी ठरले आहे. सत्ताधारी भाजप सरकारने आपल्या 27 वर्षांच्या राजवटीत राज्याला “राजकारणाची प्रयोगशाळा” बनवले आहे असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान कॉंग्रेसमध्ये निवडणुकी आधीच गळती सुरू झाल्यामुळे पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.