पुणे – बिग मिशन फाऊंडेशन (बीएमएफ) आयोजित बिग मिशन फाउंडेशन करंडक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत ब्रह्मतेज क्रिकेट क्लब संघाने वॉरियर्स क्रिकेट क्लबचा 65 धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. क्रिकेट पंडित संघाने तृतीय स्थान मिळवले.
कोद्रे फार्मस् मैदान, सिंहगड रोड येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेश गुधाते याने फटकवलेल्या नाबाद 46 धावांच्या जोरावर ब्रह्मतेज क्रिकेट क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करताना 10 षटकांत 6 गडी गमावून 145 धावा केल्या. महेशने 16 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 46 धावा केल्या. यासह दिग्विजय डी. (29 धावा) आणि शंतनु आठवले (नाबाद 25 धावा) यांनी संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली.
या आव्हानाचा पाठलाग करताना वॉरियर्स क्रिकेट क्लबचा डाव 10 षटकात 80 धावांवर संपुष्टात आला. भूषण कुलकर्णी याच्या 32 धावाव्यतिरिक्त कोणताही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. महेश गुधाते याने गोलंदाजीमध्येही चमक दाखविताना 13 धावांत 3 गडी बाद केले. अंतिम सामन्याचा सामनावीर महेश गुधाते ठरला.
तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात क्रिकेट पंडित संघाने बिग मिशन फाऊंडेशन क्रिकेट क्लबचा 7 गडी राखून सहज पराभव केला. बीएमएफ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना मयूर राजपाठक (21 धावा), गिरीष ओक (17 धावा), प्रसाद हिराळकर (13) आणि आदित्य जोशी (10 धावा) यांच्या फलंदाजीमुळे 10 षटकात 6 गडी गमावून 84 धावा केल्या. हे आव्हान क्रिकेट पंडित संघाने 6.2 षटकात व 3 गडी गमावून पूर्ण केले. कर्णधार आदित्य पाळंदे (28 धावा) आणि हर्षद जोशी (26 धावा) यांनी 49 धावांची सलामी देत विजयाचा पाया रचला.अमोल मोकाशी (नाबाद 13) आणि भगत वेलाणी (नाबाद 12) यांनी उर्वरित काम सहज करत संघाचा विजय सोपा केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण बिग मिशन फाउंडेशनचे सदस्य नितीन आवेकर आणि गिरीष ओक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे हृषिकेश राजहंस, अमित उमरीकर आणि अमोल दंभोळकर आदी उपस्थित होते. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि पदके देण्यात आली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल – अंतिम सामना – ब्रम्हतेज क्रिकेट क्लब – 10 षटकात 6 बाद 145. (महेश गुधाते नाबाद 46, दिग्विजय डी. 29, शंतनु आठवले नाबाद 25, आनंद देशमुख 4-13, अभिषेक शिंदे 2-8) वि. वि. वॉरियर्स क्रिकेट क्लब – 10 षटकात 10 बाद 80. (भूषण कुलकर्णी 32, अभिषेक शिंदे 10, महेश गुधाते 3-13, अमेय पांडे 2-19); सामनावीर – महेश गुधाते.