लंडन – अमेरिकेतील लॉस एंजलीस येथे 2028 साली होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत टी-20 क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेस्ट इंडिजसह अमेरिकेतच पुढील वर्षी आयसीसीच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत असल्याने आगामी काळात होत असलेल्या ऑलिम्पिकमधील क्रिकेटलाही प्रेक्षक लाभतील. यापूर्वीही अनेकदा ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले होते.
मात्र, एकदिवसीय क्रिकेट दीर्घकाळ खेळले जात असल्याने ते शक्य होऊ शकले नाही. मात्र, टी-20 क्रिकेटचा सामना चार तासांत संपत असल्यामुळे त्याचा समावेश व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.
तब्बल 128 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. 1900 मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. आता त्यानंतर 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासात याआधी 1900 साली क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्या ऑलिम्पिकमध्ये इंग्लंड आणि फ्रान्स संघांमध्ये क्रिकेटचा एकमेव सामना खेळवण्यात आला होता. तो जिंकून इंग्लंडनं क्रिकेटचं सुवर्णपदक जिंकलं होतं.