– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्यामोसमात पंजाब किंग्जचा संघ ज्या पद्धतीने खेळला ते पाहता त्यांच्याकडे कोणतीही योजना नसल्याचे स्पष्टच दिसून येत आहे. मात्र, खरा प्रश्न हा आहे की त्यांच्याकडे सर्वोत्तम कर्णधार आहे, सक्षम खेळाडू आहेत तरीही त्यांची ही अवस्था का व्हावी. त्यांच्याकडे थिंकटॅंक आहे का हा खरा प्रश्न आहे.
पंजाबकडे तगडी फलंदाजी आहे. कर्णधार शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, जीतेश शर्मा, सॅम कुरेन, शाहरुख खान, अथर्व तायडे असे नावाजलेले फलंदाज आहेत. गोलंदाजी पाहिली तरी सॅम कुरेनसह अर्शदीप सिंह, कागिसो रबाडासारखे जागतिक स्तरावरचे गोलंदाज आहेत. मात्र, तरीही यंदाच्याच स्पर्धेत नव्हे तर स्पर्धेच्या पहिल्या मोसमापासून आजपर्यंत त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाची त्यांची कामगिरी पाहिली तर असेच वाटते की स्पर्धेत आता त्यांच्या संघाची काही गरज तरी आहे का.
प्रत्येक संघाकडे अत्यंत प्रख्यात असा सपोर्ट स्टाफ असतो तसा पंजाबकडेही आहे पण त्यांच्याकडे कोणतीही योजनाच नसल्याचे प्रत्येक सामन्यानंतर लक्षात येते. ट्रेव्हर बेलिस, ब्रॅड हेडीन, वसीम जाफर व चार्लस लॅंगवेल्ट असे जागतिक स्तरावरचे मानांकित प्रशिक्षक आहेत. हॅडीनने तर ऑस्ट्रेलियाचा सुवर्णकाळ अनुभवलाय. ते त्याच संघात होते, मात्र, असेच म्हणावेसे वाटते की या सगळ्या चौकडीकडून पंजाबच्या खेळाडूंना काहीतरी शिकता आले की नाही. एकटा शिखर धवन किंवा अर्शदीप सिंगने त्यांना सामने जिंकून दिले आहेत. परंतु ज्यांना कोट्यवधी रुपयांचा करार देत संघात घेतले त्या अष्टपैलु सॅम कुरेनसह अनेकांनी साफ निराशा केली आहे.
आतापर्यंत पंजाबने जितके सामने खेळले त्यात पराभवच जास्त पाहावे लागले. त्यामुळेच त्यांचा संघ गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, नेतृत्व, संघ बैठक व त्यातील नियोजन या सगळ्याच बाबतीत हा संघ नेहमी कसा कमी पडतो याचा विचार संघ व्यवस्थापन किंवा त्यांच्या मॅनेजमेंटमधील थिंकटॅंक करत असतील का अशीच शंका येते.
खेळाडू जरी साधारण दर्जाचे असले तरीही ते जागतिक दर्जाची कामगिरी करु शकतात हे या स्पर्धेत अनेक संघांनी दाखवून दिले आहे, मग पंजाबला हे का जमले नाही. याचा विचार त्यांचे संघव्यवस्थापन करेल का व पुढील मोसमात त्याचे प्रत्यंतर दिसेल का हा प्रश्न आहे.