अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेला सुरुवातीला इंडियन पैसा लीग असे हिणवले गेले. 1980च्या दशकात ऑस्ट्रेलियातील माध्यमसम्राट केरी पॅकर याने अशीच एक लीग सुरू केली होती. त्याला पॅकर सर्कस असे हिणवले गेले होते. मात्र, त्याच लीगमुळे क्रिकेटमध्ये क्रांती झाली. तसेच रंगीत कपड्यांत, प्रकाशझोतात व पांढऱ्या चेंडूवर खेळले जाणारे क्रिकेट जगभरात सुरू झाले. सुरुवातीला केवळ पैशांचा खेळ असे संबोधली गेलेली आयपीएल आता मात्र, गुणवत्तेची खाण मानली जाते हे त्रिवार सत्य आहे.
जेव्हा टी-20 क्रिकेट सुरू झाले तेव्हा हे क्रिकेट कसोटी क्रिकेटला नामशेष करेल, त्याला काहीही योग्यता नाही, असे बोलणारे बोलघेवडे आता आयपीएलचे तोंडभरून समालोचन करताना दिसतात. उगवत्या सूर्याला नमस्कार हेच सूत्र आहे. आज कोणाचा दिवस आहे त्याचे नामस्मरण करायचे ही तर मानवी प्रवृत्ती म्हणा किंवा विकृती म्हणा पण जे आहे ते आहे.
आयपीएलचा जेव्हा पहिला वर्षाचा लिलाव झाला व खेळाडूंना काही कोटी रुपयांत विविध संघांनी विकत घेतले तेव्हा या खेळात इतका प्रचंड पैसा असेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. आता तर दोन किंवा चार कोटी काहीच वाटेनासे झालेत.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा ख्रिस मॉरिस चक्क 16.5 कोटी रुपये कमावून बसला आहे. इतकी रक्कम पूर्वी आपण फक्त चित्रपटांत खलनायकाच्या तोंडीच ऐकत होते. पण गेल्या चौदा वर्षांचा लेखाजोखा काढला तर केवळ भारतीय संघालाच नव्हे तर जगभरातील संघांना नवी गुणवत्ता मिळाली. हे कोणीच नाकारणार नाही. 2007 सालापासून भारतीय टी-20 संघात दाखल झालेले खेळाडू पाहिले की याची साक्ष पटते.
पूर्वी कोण गवसले याचा हिशेब मांडण्यापेक्षा आज जे खेळाडू यंदाच्या आयपीएलच्या विविध संघांत खेळताना दिसत आहेत, ते सगळे खेळाडू आयपीएल फाइंड आहेत हे काय वेगळे सांगायला हवे का. एकेकाळी इंडियन पैसा लीग असे हिणवली गेलेली ही स्पर्धा आज रत्नपारख्यांचा कारखाना बनली आहे यात शंका नाही.