चिंबळी – माजगाव (ता. खेड) येथे एकाच रस्त्याच्या कामांचे दोन दिवसांत दोनदा उद्घाटन करून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये श्रेयवाद रंगला आहे. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील आखाडा तापण्यास सुरुवात झाली आहे.
माजगाव फाटा ते माजगाव रस्ता डांबरीकरण कामाचे पहिल्यांदा रविवारी (दि. 8) आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते तर मंगळवारी (दि. 10) माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याने एकाच कामाचे दोन दिवसांत आजी-माजी आमदारांनी भूमिपूजन केल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. आमदार सुरेश गोरे यांनी रविवारी पद्मावती मंदिर येथील साकव पुलाचे देखील उद्घाटन केले. तर या पुलाचे दोन ते तीन वर्षांपूर्वी दिलीप मोहिते यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते त्यामुळे दोन-तीन वर्षांनंतर या पुलाचे पुन्हा उद्घाटन का? की केवळ निवडणुकांच्या तोंडावर विकासकामे केल्याचा दिखावा दोन्ही पक्षांकडून सुरू आहे का? अशी चर्चा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात रंगली आहे.
दिलीप मोहिते म्हणाले की, आमच्या जिल्हा परिषद सदस्या काळे या आदिवासी वर्गातील असल्याने त्यांचा आवाज दाबत आमदार सुरेश गोरे यांनी सत्तेचा दुरुपयोग करीत रस्त्याचे भूमिपूजन केले, हा त्यांच्यावर अन्याय आहे. साकव पूल आता दोन-तीन वर्षांचा झाला तो आम्ही केला त्याच उद्घाटन पण आम्ही केले होते, त्यावर परत तुम्ही रविवारी पुन्हा उद्घाटन केले. बटवाल वस्तीच्या कामाच भूमिपूजन देखील आम्ही केले आणि उद्घाटन तुम्ही करताय हे वागणे बर नव्हे, स्वतः काम मंजूर करा आणि त्याची खुशाल उद्घाटने करा असा, टोला दिलीप मोहिते यांनी आमदार गोरे यांना लगावला. तर याबाबात आमदार सुरेश गोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, दिलीप मोहिते यांचे आरोप पूर्णपणे चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.