नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतूक भाजपमधील सर्वच नेतेमंडळी प्रत्येक कामात करताना दिसतात. मात्र कधी कधी उत्साहाच्या भरात आपण काय बोलतो याचे भान नेत्यांना नसते. याचाच प्रत्यय मध्यप्रदेशमध्ये नुकताच आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखादी शक्य गोष्टी अशक्य करुन दाखवणारा नेते आहेत, असे वक्तव्य केंद्रीय राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी केले आहे. भोपाळमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये राय यांनी मोदींची स्तुती करताना अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवणारे ऐवजी शक्य गोष्ट अशक्य करुन दाखवणारे पंतप्रधान असा उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाची उद्देश साध्य करण्यासाठी खूप काम करत आहेत. या उद्देशपुर्तीच्या माध्यमातून मोठे यश मिळाले आहे. संभव को असंभव करणारी व्यक्ती म्हणजे मोदी, असे वक्तव्य राय यांनी केले आहे. मध्य प्रदेशच्या भाजपा मुख्यालयामध्ये पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच सारवासारव केली. मोदींचे निर्णय वेगळे आणि अतुलनिय असतात असे मला म्हणायचे होते, असे स्पष्टीकरण राय यांनी दिले. मात्र राय यांच्या या वक्तव्यावरुन राज्यातील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या कॉंगेसने भाजपाला टोमणा लगावला आहे. अखेर सत्य बाहेर आलेच. केंद्रीय मंत्री असणाऱ्या राय यांनी सत्य मान्य केले, असा टोला कॉंग्रेसचे राज्यातील प्रवक्ते नरेंद्र सालुजा यांनी लगावला आहे.