पिंपरी – महावितरणच्या भोसरी विभागातील भोसरी उपविभाग व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन भोसरी उपविभाग-2ची निर्मिती करण्यात आली आहे. नव्याने तयार झालेल्या भोसरी उपविभाग-2 चे कार्यालय व त्या अंतर्गत तीन शाखा कार्यालयांमध्ये एकूण 69 तांत्रिक व अतांत्रिक पदे मंजूर करण्यात आली आहेत, असे महावितरणने जाहिर केले आहे.
भोसरी व आकुर्डी उपविभागाचे विभाजन करून नवीन उपविभाग व त्याअंतर्गत तीन शाखा कार्यालयांची निर्मिती करण्यात यावी यासाठी आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा सुरू होता. जुलै 2023 मध्ये विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मंजूर केली. त्यानुसार आता भोसरी उपविभाग-2 ची निर्मिती करण्यात आली आहे.
यांचा असेल समावेश
भोसरी विभागाच्या नव्या रचनेत आता भोसरी उपविभाग-1 मध्ये भोसरी गाव, चऱ्होली, नाशिक रोड शाखा आणि नवनिर्मित भोसरी उपविभाग-2 मध्ये इंद्रायणीनगर (नवनिर्मित), मोशी व स्पाइनसिटी (नवनिर्मित) शाखा यांचा समावेश असेल. आकुर्डी उपविभागामध्ये चिंचवड, संभाजीनगर व चिखली (नवनिर्मित) शाखा असे प्रत्येकी तीन शाखा कार्यालय राहतील.
पदे मंजूर
नव्या भोसरी उपविभाग-2 कार्यालयामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक लेखापालचे प्रत्येकी एक पद, निम्नस्तर व उच्चस्तर लिपिकांचे 6 पदे तसेच मुख्य तंत्रज्ञ, शिपाईचे प्रत्येकी एक पद असे 12 पदे मंजूर करण्यात आली आहेत. तसेच नव्या चिखली, इंद्रायणीनगर व स्पाईनसिटी शाखा कार्यालयांमध्ये सहायक अभियंता, प्रधान तंत्रज्ञ, वरिष्ठ तंत्रज्ञ व तंत्रज्ञ, कनिष्ठ कार्यालयीन सहायक असे प्रत्येकी 19 पदे मंजूर करण्यात आले आहेत.
दर्जेदार सुविधा मिळेल
भोसरी विभागातील भोसरी व आकुर्डी उपविभागात सुमारे 2 लाख 70 हजार वीजग्राहक होते. विभाजनानंतर आता भोसरी उपविभाग-1 मध्ये 72 हजार, भोसरी उपविभाग-2 मध्ये 68 हजार आणि आकुर्डी उपविभागात 1 लाख 30 हजार अशी ग्राहकसंख्या राहणार आहे. तसेच नवीन 69 तांत्रिक व अतांत्रिक पदांची निर्मिती झाल्यामुळे या सर्व ग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजसेवा मिळेल, असे मुख्य अभियंता राजेंद्र पवार सांगितले.