नवी दिल्ली – विरोधकांच्या विरोधानंतर केंद्र सरकारने 14 फेब्रुवारी हा ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन मागे घेतले आहे. यापूर्वी, सरकारच्या अखत्यारीतील प्राणी कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारण्याचा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले होते.
आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांसह अनेक विरोधी पक्षांनी 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाला विरोध केला होता, त्यानंतर सरकारने आता हा निर्णय मागे घेतला आहे.
The appeal issued by the Animal Welfare Board of India for celebration of Cow Hug Day on 14th February 2023 stands withdrawn. pic.twitter.com/5MvEbHPdBZ
— ANI (@ANI) February 10, 2023
‘काऊ हग डे’वर विरोधकांनी लगावला टोला –
14 फेब्रुवारी हा गायीला मिठी मारण्याचा दिवस म्हणून साजरा करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी हे देखील मोदींसाठी पवित्र गायीसारखे असल्याचा दावा शिवसेनेने केला होता. तसेच अनेक विरोधकांनी काऊ हग डे ही देशासाठी हास्यास्पद आणि लज्जास्पद संकल्पना असल्याचे म्हटले होते.
प्राणी कल्याण मंडळाने 6 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या अपील पत्रात युक्तिवाद केला होता की, आपणा सर्वांना माहित आहे की, गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मानवतेला सर्वस्व पुरवणाऱ्या मातेप्रमाणे पालनपोषण करणाऱ्या स्वभावामुळे ती “कामधेनू” आणि “गौमाता” म्हणून ओळखली जाते. त्यामुळे 14 फेब्रुवारी रोजी सर्वांनी गायीला मिठी मारून हा दिवस साजरा करावा. मात्र विरोधकांच्या जोरदार विरोधामुळे सरकारने आता हा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत प्राणी कल्याण मंडळाने पत्रक जारी करून निर्णय मागे घेतला आहे.