नगर -शहरासह जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. बूथ हॉस्पिटल व जिल्हा रूग्णालयासह काही खासगी रूग्णालयामध्ये ही रुग्णांनावर उपचार करण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे महापालिकेतर्फे आनंद लॉन येथे कोविड सेंटर उभारण्यात आले असून, मोफत उपचार सुरु करण्यात येणार असल्यचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.
नव्याने सुरु झालेल्या कोविडची पहाणी महापौर वाकळे यांनी केली. यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, आयुक्त श्रीकांत मायकलवार, अजय ढोणे, सतिष शिंदे, मनोज ताठे, उदय कराळे, पुष्कर कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे व कर्मचारी आदी उपस्थित होते.
या कोविड सेंटर मध्ये रूग्णांना उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच या ठिकाणी मनपाचे एक एम डी फिजीशियन, एक बालरोग तज्ज्ञ, एक जनरल डॉक्टर व नर्सेस, आरोग्य व इतर विभागातील असे 15 कर्मचारी कार्यरत असून, यावरील सर्व खर्च मनपा करणार आहे.
महापौर वाकळे म्हणाले की, लॉकडाउनच्या काळामध्ये मनपाने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेतली होती व आजतागायत ती सुरू आहे. मनपाच्या व्हिजीलन्स स्कॉड द्वारे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरु आहेत. तसेच रामकरण सारडा येथे शहरातील नागरिकांसाठी मोफत स्त्राव चाचणी केंद्र सुरू करण्यात आलेली आहे.
मनपाच्या वतीने सात आरोग्य केंद्रा मार्फत 42 आरोग्य पथकाची नियुक्ती केलेली आहे. या आरोग्य पथकांमार्फत पॉझिटीव्ह रूग्ण आढळलेल्या भागामध्ये सर्व्हेक्षण करणे हायरिस्क तसेच लोरिस्क कॉन्टॅक्ट शोधने त्यांच्या चाचण्या करून त्यांच्यावर औषधोपचार करणे व आरोग्य विभागामार्फत त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण केले जात आहे.
आजअखेर शहरामध्ये 55 ते 56 कन्टेन्मेंट झोन मनपाद्वारे जाहीर करण्यात आली आहेत. या झोनमध्ये मनपामार्फत नागरिकांसाठी दूध, भाजीपाला, औषधे तसेच जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व इतर काही तातडीच्या सेवा देण्यात येत आहेत. मनपाचे आतापर्यत 13 क्वारन्टाइन सेंटर कार्यरत असून 2 हजार बेडची क्षमता या सेंटरची आहे.
योवळी नगरसेवक गंधे म्हणाले की, मनपाने सुरू केलेल्या कम्युनिटी किचन मार्फत आजपर्यत 20 ते 25 हजार नागरिकांना मोफत अन्नवाटप करण्यात आले. हॉटेल संजोग व जाधव लॉन या दोन ठिकाणी किचनसह या कम्युनिटी किचनची सुरूवात करण्यात आली होती.
यातील संजोग लॉन येथील किचन नागरिकांच्या सेवेत अजूनही उपलब्ध आहे. तसेच करोनाची बाधा झालेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी असलेले रूग्णालय बूथ हॉस्पिटल येथील रूग्णांचा सर्व खर्च हा मनपा मार्फत केला जात असल्याचे वाकळे यांनी सांगितले.