छेडछाड प्रकरणी न्यायालयाने युवकाला दिली ‘भन्नाट शिक्षा’; ६ महिने २००० महिलांचे कपडे धुवावे लागणार

मधुबनी : देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण रोज वाचतो किंवा ऐकत असतो. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढच होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीना सहसा तुरुंगवासाची किंवा दंडाची शिक्षा न्यायालय देताना दिसत. मात्र बिहारमध्ये महिला छेडछाड प्रकरणात आरोप सिद्ध झालेल्या एका आरोपीला न्यायालयाने दिलेली शिक्षा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात झंझारपूर येथील स्थानिक न्यायालयाने महिलेशी छेडछाड आणि अश्लिल वर्तवणूक करणाऱ्या एका आरोपीला गावातील सर्व महिलांचे कपडे धुण्याचे आदेश दिले आहेत. याच अटीवर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने या प्रकरणात सुनावणी करताना, पुढील ६ महिने आरोपीने गावातील सर्व महिलांचे कपडे धुवावे जेणेकरून त्याच्या मनात महिलांप्रती आदर निर्माण होऊ शकेल असे म्हटले आहे.  इतकचं नाही तर आरोपीने महिलांचे कपडे धुवून झाल्यानंतर ते प्रेस करून घरोघरी जाऊन ते परत करावेत असेही न्यायालयाने सांगितले आहे. न्या. अविनाश कुमार यांनी या प्रकरणात सुनावणी करत २० वर्षीय आरोपी ललन कुमारला फटकारत महिलांचा सन्मान करण्यास सांगितले आहे.

या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना न्यायालयाने आरोपीला विचारले की, तो कुठला व्यवसाय करतो. त्यावर त्याने धोबीकाम करत असल्याचे सांगितले. तेव्हा न्यायालयाने महिलांचे कपडे धुण्याचे आदेश दिले. गावात जवळपास २००० महिलांची लोकसंख्या आहे. म्हणजे आरोपीला पुढील ६ महिने २००० महिलांचे कपडे मोफत धुवावे लागणार असून त्यानंतर त्याला इस्त्री करून त्यांना परत करावे लागतील. तसेच आरोपी ललन योग्यप्रकारे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करतोय की नाही हे पाहण्याची जबाबदारी गावातील सरपंच अथवा ग्रामसेवक यांच्याकडे राहणार आहे.

आरोपी ललनला त्याने केलेल्या मोफत कामाबद्दल सरपंच अथवा ग्रामसेवकाकडून प्रमाणपत्र आणून ते न्यायालयात सादर करावे लागेल. न्यायालयाने अटी-शर्थींसह दिलेला जामीन अर्जाची कॉपी सरपंच आणि गावातील प्रमुखांकडे पाठवला आहे. लौकहा पोलीस ठाण्यात ललन कुमार याच्याविरोधात १९ एप्रिलरोजी छेडछाड आणि महिलांशी गैरवर्तवणूक करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

लौकहा पोलीस ठाण्याचे संतोष कुमार मंडल यांनी सांगितले की, १७ एप्रिलला रात्री गावातील एका महिलेसोबत छेडछाड आणि तिच्याशी गैरवर्तवणूक करण्याचा प्रयत्न आरोपी ललन कुमारने केला होता. १८ एप्रिलला पीडित महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर ही पुढील कारवाई करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.