लिबरल आर्टस् सारखे अभ्यासक्रम आत्तापर्यंत दुर्लक्षित – शशी थरूर

Madhuvan

पुणे – आपल्या देशातील बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा कायम विज्ञान शाखेकडे राहिलेला आहे. लिबरल आर्टस् सारख्या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थी व पालक या सर्वांचेच आजपर्यंत दुर्लक्ष झालेले आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये लिबरल आर्टस् सारख्या अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी काही विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. असे विधान डॉ. शशी थरूर,लोकसभा खासदार यांनी केले.

सिंबायोसिस संस्थेच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात संस्थेतर्फे आयोजित “साहित्य महोत्सव २०२०” च्या उदघाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शशी थरूर याना आमंत्रित करण्यात आले होते. साहित्य महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्यामध्ये डॉ. शशी थरूर यांनी भाषण केले व त्यांनी लिहिलेल्या “थरूरसोरस ” या पुस्तकाचे प्रकाशन सिंबायोसिस चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां .ब. मुजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले.

विज्ञान शाखा व लिबरल आर्टस् या मधील फरक स्पष्ट करताना डॉ. थरूर म्हणाले कि विज्ञानामध्ये संकल्पना या स्पष्ट असतात त्यामध्ये दुमत असू शकत नाही, त्यातील ठोकताळे हे पक्के असतात तर लिबरल आर्टस् सारख्या विषयामध्ये एखाद्या संकल्पनेकडे कडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन हा वेगवेगळा असू शकतो व त्यामुळेच एकाच गोष्टीचे विविध प्रकारे विश्लेषण करता येते. परंतु त्यामधून काहीवेळा संघर्ष देखील उद्भवण्याची शक्यता असते.

आपल्या भाषणात पुढे बोलताना डॉ. थरूर म्हणाले , मी माझ्या लहानपणी शिकलो होतो कि, लेखणीची धार ही तलवारीच्या धारेपेक्षा अधिक असते परंतु आपल्या देशातील सद्य परिस्थिती पाहता असे दिसते कि आपल्या लेखणीतून आवाज उठवणाऱ्यांचा आवाज हा बळाचा वापर करून बंद करण्यात येतो आणि त्यामुळेच आपले विचार लेखांतून व्यक्त करताना खूप काळजी घ्यावी लागते. आपले शब्द आणि कल्पना सामर्थ्य यांना शक्ती व अधिकार यांच्या साहाय्याने नियंत्रणात आणले जात आहे यासारखे दुर्दैव नाही.

विद्यार्थ्यांना संदेश देताना डॉ. थरूर यांनी सांगितले कि, तुम्ही कोणत्याही शाखेचा अभ्यासक्रम शिका पण त्याबरोबरच काही प्रमाणात साहित्य आणि इतिहास यांचे देखील शिक्षण घ्या जेणेकरून तुमच्या स्वतःच्या विचारशक्तीला चालना मिळेल. तुम्हाला नक्की कशाची आवड आहे व कोणती गोष्ट केल्याने तुम्हाला आनंद मिळतो हे ओळखा व  त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. एकावेळी अनेक गोष्टी करण्याच्या मागे लागू नका असे केल्याने तुम्ही कोणत्याच गोष्टीला न्याय देऊ शकणार नाही.

सदर कार्यक्रमासाठी सिंबायोसिस चे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र- कुलपती डॉ.विद्या येरवडेकर व कुलगुरू डॉ.राजनी गुप्ते, उपस्थित होते. डॉ. अनिता पाटणकर, संचालिका, सिंबायोसिस लिबरल आर्टस् यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर डॉ. आरती वाणी, सहयोगी प्राध्यापिका, इंग्रजी विभाग, सिंबायोसिस कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांनी डॉ. थरूर यांच्याशी संवाद साधला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.