नवी दिल्ली : भारतातील सर्वात वयोवृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे आज सकाळी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. सर्व क्षेत्रातील मान्यवरांनीकेशब महिंद्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दरम्यान, महिंद्राची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या 48 वर्षांच्या कालावधीत, महिंद्रा समूहाचा विस्तार ऑटोमोबाईल उत्पादक ते आयटी, रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवा यासारख्या इतर व्यवसाय विभागांमध्ये झाला. केशब महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष होते, यूएसए, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे ते पदवीधर होते. 1947 मध्ये कंपनीत रुजू झाल्यानंतर 1963 मध्ये ते चेअरमन झाले.
विलीज कॉर्पोरेशन, मित्सुबिशी, इंटरनॅशनल हार्वेस्टर, युनायटेड टेक्नॉलॉजीज, ब्रिटीश टेलिकॉम आणि इतर बर्याच मोठ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
महिंद्राच्या वेबसाइटनुसार केशब महिंद्रा यांची केंद्रीय उद्योग सल्लागार परिषदेसह अनेक समित्यांवर काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. 2004 ते 2010 पर्यंत, ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे, नवी दिल्लीचे सदस्य होते.
त्यांनी सेल, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स, आयएफसी आणि आयसीआयसीआयसह विविध कंपन्यांच्या बोर्ड आणि कौन्सिलवरही काम केले आहे. अलीकडेच, केशब महिंद्रा यांचा समावेश फोर्ब्स मासिकाने 2023च्या यादीत केला होता. फोर्ब्सने सांगितले होते की ते सर्वात वयस्कर भारतीय अब्जाधीश आहेत.