मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठी सिने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटातून महाराष्ट्रातील जडणघडणीतील अनेक पैलू सर्वांसमोर येणार आहेत. या चित्रपटात मराठमोळा अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत आहे.या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला.
शाहीर साबळे यांच्या जीवनातील अनेक गोष्टी या निमित्ताने मोठ्या पडद्यावर केदार शिंदे उलगडणार आहेत. साबळे यांच्या गाण्याची सुरुवात कशी झाली. त्यांचे शिक्षण.. अचानक झालेले लग्न तसेच राजकीय नेत्यांशी आलेला संबंध या सगळ्या गोष्टींचा उलगडा या चित्रपटातून होणार आहे. ट्रेलर अतिशय जबरदस्त असून जुन्या काळाची सुंदर झलक यावेळी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
ठाकरे-चव्हाण अवतरणार पडद्यावर
बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण या दोन राजकीय व्यक्तिरेखा यानिमित्ताने मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत होणार आहेत. शाहीर साबळे यांचा या राजकारण्यांशी आलेला संबंध ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. प्रचारासाठी गळ घालणाऱ्या राजकारणी मंडळींना शाहीर अक्षरशः “आम्ही कलाकार आहोत मिंधे नाही कोणाचे” असं ठणकावून सांगताना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.
अजय-अतुलची जादू पुन्हा चालणार
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबतच अजय-अतुल यांनी प्रदीर्घ काळानंतर सिनेमा केला आहे. याआधी देखील या जोडीने केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. अजय अतुल यांचा आवाज असलेली तडफदार गाणी यानिमित्ताने प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत. अन् अंबाबाई गोंधळाला ये…या एनर्जेटिक गाण्याची जबरदस्त झलक यानिमित्ताने ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. त्यामुळे झिंगाटप्रमाणे अजय अतुललच्या गाण्यावर प्रेक्षक पुन्हा एकदा थिरकणार आहेत.
चित्रपटात अंकुश चौधरी यांच्यासोबत अमित डोलावत, सना केदार शिंदे,अतुल काळे आदी कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 28 एप्रिल 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.