अशोक सुतार
सिटेज हे बार्सिलोनाजवळ असलेले भूमध्यसागरी किनाऱ्यावर वसलेले शहर आहे. सिटेज कार्निव्हल हा स्पेनमधील मोठा कार्निव्हल असून जगातील पहिल्या दहा कार्निव्हल उत्सवांपैकी एक म्हणून ओळखला जातो. स्पॅनिश भूमध्य प्रदेशात दरवर्षी होत असलेला कार्निव्हल या वर्षी 18 ते 26 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात आला.
स्पेनमधील सर्वात प्रसिद्ध आणि जगातील समलिंगी समुदायाने पसंती दिलेला हा कार्निव्हल वर्षातून एकदा सिटेज (बार्सिलोनाच्या पुढे असलेले रमणीय कॅटेलोनियन शहर) येथे फेब्रुवारी महिन्यात घेतला जातो. लेंट सुरू होण्यापूर्वी सिटेज कार्निव्हल घेतला जातो. सर्व मोह, माया भोगून त्यापासून विरक्ती निर्माण व्हावी, मानवी जीवनात बदल निर्माण व्हावा, असा कार्निव्हलचा हेतू आहे. या कार्निव्हलमध्ये खाद्यपार्ट्यांमध्ये लोक सामील होतात, विचित्र वेशभूषा करून आनंद घेतात.
सिटेज कार्निव्हल हा सात दिवसांचा भव्य महोत्सव आहे. तरुण आणि वृद्ध प्रत्येकजण रंगीबेरंगी कार्निव्हल पोशाखात वेषभूषा करतात. सिटेज कार्निव्हलमध्ये लोकांची वेशभूषा ब्राझिलियन किंवा कॅरिबियन कार्निव्हल्सच्या वेळी पाहिल्या गेलेल्या पोशाखांसारखीच आहेत. सिटेज कार्निव्हल हा युरोपमधील सर्वात सुरक्षित उत्सव म्हणून ओळखला जातो. सिटेजही युरोपची स्वयं-घोषित समलिंगी राजधानी आहे. अधिकृत सिटेज कार्निव्हल सेलिब्रेशन्सच्या चार दिवस अगोदर येथे रस्त्यावर रंग, संगीत आणि नृत्य यांनी सजलेली समलिंगी प्राइड परेड होते.
जेव्हा कार्निव्हलचा राजा (किंग ऑफ सिटेज कार्निव्हल) प्रवेश करतो, त्यावेळी सिटेज कार्निव्हल अधिकृतपणे सुरू होते. कार्निव्हल दरम्यान रविवारीची परेड म्हणजे नामांकित दिवस आणि मंगळवारी साजरा होणारा रुआडेल एक्स्टर्मिनिओ म्हणून संहार दिन ओळखला जातो. रुआडेल एक्स्टर्मिनिओ हा कार्निव्हल दरम्यान सर्वात मोठा कार्यक्रम आहे. या कार्निव्हलची स्थापना 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे. त्याची मुळे 700 वर्षांपूर्वी कार्लेसडी कॅनटोर्रास नावाच्या माणसाच्या कथेतून उगम पावली आहेत. ऍशच्या बुधवारी त्याचा मृत्यू झाला. परंतु सिटेजच्या लोकांनी त्याची आठवण कायम ठेवली आणि कार्निस्टोलेट्स म्हणून ओळखले जाऊ लागले. किंग ऑफ सिटेज कार्निव्हल हे काल्पनिक पात्र असून ते या माणसावर आधारित आहे.
19व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिकीकरणाला पाठिंबा देणारा आणि त्याला विरोध करणारा असे दोन वर्ग निर्माण झाले. दोन्ही समाज सिटेजच्या सामाजिक जीवनावर नियंत्रण ठेवत होते आणि कार्निव्हल आल्यावर दोन गटांपैकी उत्कृष्ट कार्निव्हल उत्सव कोणत्या ठिकाणी केले जातात हे पाहण्यासाठी दोन गटांमध्ये चांगलीच स्पर्धा होती.