तूरडाळीत भ्रष्टाचार करणारे लोकसभेत काय करणार?

कॉंग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांची टीका

पुणे – तूरडाळ घोटाळे करणारे लोकसभेत जाऊन काय करणार, अशी टीका कॉंग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते शरद रणपिसे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. मागील लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ” ना खाऊंगा ना खाने दुंगा’ अशी घोषणा दिली. मात्र, केंद्रात राफेल तर राज्यात चिक्की, तूरडाळसारखे घोटाळे केल्याचा आरोप रणपिसे यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते जयदेव गायकवाड, कॉंग्रसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यावेळी उपस्थित होते.

रणपिसे म्हणाले, “भाजप सरकार भ्रष्टाचारात अडकले आहे. आम्ही विधानसभा आणि विधानपरिषदेत हे घोटाळे समोर आणले. मात्र, प्रत्यके वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांना “क्‍लीन चीट’ दिली. 650 कोटींचा चिक्की घोटाळ, 250 कोटींचा तूरडाळ घोटाळा, मुंबईचा विकास आराखडा, राज्यशासनाची औषध खरेदी ही त्यातीलच प्रकरणे आहेत. सरकार या विषयांवर चर्चा करायलाही तयार होत नाही. त्यामुळे भाजपचे पुण्यातील उमेदवार गिरिश बापट यांनी या घोटाळ्याचे पुढे काय झाले, विरोधकांच्या आरोपांवर काय चौकशी झाली याचा जाहीर खुलासा करावा, असे आव्हान दिले. तर देशातील शेतकरी, युवक, गरिबांच्या समस्या गेल्या पाच वर्षांत कायम आहेत. त्यामुळे सरकारविरोधात वातावरण असून जनतेच्या मनातील महाआघाडीची सुप्त लाट पाहता, भाजपला या निवडणुकीनंतर सत्तेतून पाय उतार व्हावे लागणार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते गायकवाड यांनी यावेळी बोलताना केला.

संविधनाच्या रक्षणासाठी एकत्र यावे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाने निर्माण केलेल्या तसेच लोकशाहीचा आधार असलेल्या संस्था मोडीत काढण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेने संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येऊन धर्मांध शक्तींना दूर ठेवावे, असे आवाहनही रणपिसे यांनी यावेळी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.