पुणे – महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि उद्यम विकास सहकारी बॅंकेचे अध्यक्ष महेश नामदेव लडकत (वय 53) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी अकरा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
नगरसेवक लडकत यांना पोटाचा विकार झाला होता, त्यांची लिव्हर ट्रान्सप्लान्टची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्यावर गेल्या आठ महिन्यांपासून उपचार सुरू होते.
खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.
पतित पावन संघटनेपासून कामाला सुरुवात केलेल्या लडकत यांनी पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते.