पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन 58 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरामध्ये आजपर्यंत 96195 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 2471 जणांचा मृत्यू झाला.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 58 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची आज नोंद झाली नाही. आज शहरातील पिंपरी येथील 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2471 झाली आहे. त्यामध्ये शहरातील 1751 व शहराबाहेरील 720 रुग्णांचा समावेश आहे.
आज दिवसभरात 172 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 92951 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 1169 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 842 रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 744 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 749 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1493 इतकी आहे.