जुन्नर – योग गुरु बाबा रामदेव यांची “पतंजली आयुर्वेद’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतंय. करोना उपचारांसाठी आपल्या ‘कोरोनिल’ औषधामुळे रामदेव बाबा अडचणीत सापडेल आहेत. कोरोनील औषधाविरोधात जुन्नर मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे एका व्यक्तीने तक्रार केली आहे.
मदन कुऱ्हे (25 वर्ष) असं तक्रारदाराचं नाव असून तो कायद्याचे शिक्षण घेत आहे. न्यायालयाने कुऱ्हे याला आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनीला पाठवलेल्या नोटीस सादर करण्यास सांगितले आहे. कोरोनील औषधाविरोधातील ही महाराष्ट्रातील पहिली तक्रार असल्याचं सांगितलं जात आहे.
मदन कुऱ्हे यांनी योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात फसवणूक, कट रचणे प्राणघातक साथरोग पसरवण्यास कारणीभूत ठरणे आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही तक्रार दाखल केली.
रामदेव बाबा यांनी आपल्या कोरोनील औषधाने करोना रुग्ण हा केवळ तीन दिवसात पूर्णपणे बरा होतो असा विश्वास दाखवला होता. तसेच हे औषध रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठीचे बुस्टर असल्याचे देखील बाबांनी म्हंटले होते. मात्र, त्यांनी केलेला हा दावा शुद्ध फसवणूक असून हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचं मदन कुऱ्हे यांनी म्हंटल.