पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी तब्बल 1248 करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांचे रुग्णालयानुसार प्रभागाची विभागणी केली असता संपूर्ण शहरात करोनाने पाय पसरले असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी शहरातील एक ते दोन प्रभागांमध्येच शंभरहून अधिक रुग्ण आढळून येत होते. परंतु बुधवारी शहरातील सर्व प्रभांगामध्ये करोनाने शंभरी ओलांडली आहे.
करोनाची लाट ओसरल्यानंतर मार्च महिन्यात पुन्हा करोना रुग्णसंख्या वाढत होती. सुरुवातीला महापालिकेच्या “ड’ आणि “ह’ या दोन प्रभागांमध्येच सर्वाधिक बाधित आढळत होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे या प्रभागांवर विशेष लक्ष होते.
मात्र, आता दुसऱ्या लाटेत करोनाने संपूर्ण शहरालाच आपल्या कवेत घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात आता 100 पेक्षा अधिक करोनाबाधित आढळले असून आता नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.