बारामती -माळेगाव (ता. बारामती) येथील 37 वर्षीय व्यक्तीस करोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालातून निष्पन्न झाले आहे. दरम्यान, संबंधित रुग्ण पुण्यात असताना करोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्यानेच त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट असल्याने त्याला माळेगाव येथे करोनाची लागण झाली नसल्याचेही निष्पन्न झाले आहे. तर गावची महसुली सीमा फक्त बंद करण्यात आली आहे. बारामती शहर व एमआयडीसीच्या कामकाजावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
करोनाची लागण झालेला रुग्ण पुणे येथे वायरमन म्हणून काम करत आहे. त्याच्या एका मित्राला करोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्याने आपणहूनच प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधला. त्याची तपासणी केल्यानंतर मंगळवारी (दि. 12) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी माळेगाव बुद्रूक या गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली असून, अत्यावश्यक सेवा वगळून इतर सेवा व व्यवहारांसह वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. बारामती शहराच्या बाजारपेठेवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
दरम्यान, माळेगाव येथील हा दुसरा करोनासंक्रमित रुग्ण आहे तर ग्रामीण भागातील तिसरा रुग्ण ठरला आहे. पुणे मुंबई येथील नागरिक बारामतीत स्थलांतरित होत आहेत, नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे अवाहन प्रांताधिकारी यांनी केले आहे. रुग्णाच्या संपर्कातील घरातील 9 जणांची करोना तपासणी बुधवारी (दि. 13) करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने सर्व्हे सुरू करण्यात आला असून रुग्णाच्या संपर्कातील इतर व्यक्तींचा देखील शोध घेतला जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.