जम्मू – वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्येही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, त्या केंद्रशासित प्रदेशातील 11 जिल्हे 84 तासांसाठी लॉक राहतील.
जम्मू-काश्मीरात मंगळवारी 3 हजार 164 नवे करोनाबाधित आढळले. ती तेथील एकाच दिवसातील आजवरची उच्चांकी संख्या ठरली. त्यामुळे जम्मू-काश्मीर प्रशासनाने निर्बंध आणखी कडक करण्यासाठी पाऊल उचलले.
आता तेथील 11 जिल्ह्यांत गुरूवारी सायंकाळी 7 पासून सोमवारी सकाळी 7 पर्यंत लॉकडाऊन असेल. याआधी जम्मू-काश्मीरच्या 8 जिल्ह्यांतील शहरी भागांत 8 एप्रिलपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्याची व्याप्ती जम्मू-काश्मीरमधील सर्व 20 जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर शनिवारच्या रात्रीपासून संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये 34 तासांची संचारबंदी लागू करण्याचे प्रशासनाने ठरवले होते. मात्र, तो निर्णय बदलून लॉकडाऊनचे पाऊल उचलण्यात आले आहे.