शिमला – हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना करोनाबाधा झाली. भाजप नेते असणाऱ्या ठाकूर यांनी स्वत:च ट्विटरवरून त्याबाबतची माहिती दिली.
एका करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने ठाकूर यांनी मागील आठवड्यापासून स्वत:ला निवासस्थानीच क्वारंटाइन करून घेतले होते. त्यानंतर काही लक्षणे आढळल्याने ते करोनाविषयक चाचणीला सामोरे गेले. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
आता डॉक्टरांच्या सल्ल्यावरून ते शासकीय निवासस्थानी विलगीकरणात राहणार आहेत. ठाकूर यांच्या रूपाने करोनाबाधित उच्चपदस्थांच्या यादीत भर पडली आहे.
याआधी काही केंद्रीय मंत्र्यांना आणि खासदारांना करोनाबाधा झाली. त्याशिवाय, शिवराजसिंह चौहान (मध्यप्रदेश), बी. एस. येडियुरप्पा (कर्नाटक), मनोहरलाल खट्टर (हरियाणा) आणि पेमा खांडू (अरूणाचल प्रदेश) या मुख्यमंत्र्यांनाही याआधी करोना संसर्ग झाला.