आजपर्यंतचे 145 करोनाबाधित : बारापैकी दोन रुग्ण शहराबाहेरील
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील पाच युवकांसह पिंपळे गुरव, मोहननगर व चिंचवड येथील दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच शहराच्या हद्दीबाहेरीलही दोन रुग्णाला करोनाची लागण झाली आहे. यामुळे एकाच दिवसात बारा जणांना “करोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या 145 झाली आहे. करोनाचा उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा 74 वर पोहचला आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने 204 जणांचे नमुने करोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी काही अहवाल प्राप्त झाले आहेत. तर पुणे येथील दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 21, 23, 24, 25, 28, 33, 33 वर्षीय तरुण आणि 52 व 50 वर्षीय दोन पुरुषांचा समावेश आहे.
शहरातील एका 28 वर्षीय महिलेचाही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर पुणे शहरातील 28 व 48 वर्षीय महिलाही करोनाबाधित आहे. यामधील सात जणांवर भोसरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर उर्वरित पाच रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. एकाच दिवशी शहरातील दहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पुणे शहरातील रुग्णांचा अतिरिक्त ताणही रुग्णालयांवर येत आहे.
पुणे येथील एक रुग्ण करोनामुक्त
सिंहगड रोड पुणे येथील रहिवाशी असलेल्या परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचे दोनही वेळचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीला घऱी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत शहरातील करोनामुक्त रुग्णांची संख्या 60 झाली आहे.
पुण्यातील दोन महिलांचा मृत्यू
शिवाजीनगर, पुणे येथील रहिवाशी असलेल्या करोनाबाधित महिलेचा पिंपरी महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच येरवडा येथील एका अत्यवस्थ महिलेला काल रात्री “वायसीएम’मध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे “वायसीएम’मध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सात झाली.
नव्याने सील करण्यात आलेले परिसर
– मोशी येथील वुड्सव्हिले सोसायटी बॉर्डर, वुड्सव्हिले रोड, साई फॅब्ररोटेक, हॉटेल शेअरिंग स्पून, आर्या हॉस्पिटल, डीपी रोड
– चिंचवड येथील मोहनगर परिसरातील श्रीराम सुपर मार्केट, श्रीराम मेडिकल शॉप, श्रीराम चौक, टाटा मोटर्स सर्व्हिसिंग सेंटर, वसंत इंडस्ट्रीज
– चिखली येथील कस्पटेवस्ती, बीआरटी टेल्को रोड, जम्बों किंग हॉटेल, एचडीएफसी बॅंक ए.टी.एम, राष्ट्रमाता जिजाऊ मंगल कार्यालय
– काळेवाडी येथील काळेवाडी फाटा, भारत गॅस, सेंट अल्फोन्सो स्कूल, फेडरल बॅंक, मदर टेरेसा फ्लायओव्हर, पवना नदी, काळेवाडी पिंपरी पूल, सेवा विकास को.ऑ. बॅंक, पोलीस चौकी काळेवाडी फाटा
हे परिसर सील करण्यात आले आहेत. या परिसराच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे.