दुमाला येथील 54 वर्षीय कांदा व्यापाऱ्याचा मृत्यू
मांडवगण फराटा-शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील 54 वर्षीय करोना संसर्गित पुरुषाचा उपचारादरम्यान शिरूर येथील खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. अशी माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली. मृत्यू झालेला रुग्ण हा कांदा व्यापारी आहे.
या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला अगोदर संसर्ग झाला होता. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये या व्यापाऱ्याचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना पुढील उपचारासाठी शिरूर येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आज (दि. 6) त्यांचे निधन झाले.
शिरूरच्या पूर्व भागात करोनाचा दिवसेंदिवस कहर सुरुच असून आजपर्यंत 34 रुण आढळले आहेत. नागरगाव, मांडवगण फराटा व गणेगाव दुमाला येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आता तरी नागरिकांनी यापुढे करोनाला गांभिर्याने घेत प्रशासनाला सहकार्य करावे. त्याचाबरोबर करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी घरात न राहता दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत. करोना पॉझिटिव्ह रुग्णांनी आरोग्य विभागाला वेळोवेळी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.