पुणे – शहरात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही हा संसर्ग वाढत आहे. बुधवारी पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत 4 पोलीस ठाण्यांतील 8 जणांना करोना संसर्ग झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांचा यात समावेश आहे.
शिवाजीनगर परिसरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह दोघांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ठाण्यातील सर्वच 27 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सोबतच शहराच्या पश्चिम भागातील एका पोलीस ठाण्यातील एक उपनिरीक्षक आणि 2 कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यासोबत काम करत असलेल्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. यांसह ससून हॉस्पिटलजवळील एका पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. तर, अन्य एका ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास करोना झाल्याने तेथील अन्य कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे पोलीस दलात दिवसभरात 43 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. पुणे पोलीस दलाच्या एका महत्त्वाच्या विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला करोना संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कातील सर्वांची तपासणी केली गेली. आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येईल. सध्या क्वारंटाइनचा कालावधीही कमी झाला आहे, असे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
बाधितांचा आकडा 132 वर
यापूर्वी दि. 27 जून रोजी 10 पोलिसांना करोना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हा सुमारे 30 जणांना क्वारंटाइन केले होते. शहरात आजवर 132 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील अनेकजण उपचार घेतल्यानंतर करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये एका सहायक पोलीस आयुक्ताचा समावेश आहे.