पुणे – शहरातील बाधितांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मागील तीन महिन्यांतील दि. 1 ते 20 तारखेदरम्यान बाधितांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी बाधित सापडले आहेत. हे प्रमाण तब्बल निम्म्यापेक्षाही कमी आहे. बुधवारी दिवसभरात 428 बाधित सापडले. तर 758 जण करोनामुक्त झाले. दरम्यान, बाधितांची संख्या कमी होत असली तरी मृतांची संख्या तुलनेने वाढलेलीच आहे.
गेल्या 24 तासांत 31 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूच्या संख्येने 4 हजारांना टप्पा पार केला.
दरम्यान, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत सर्वाधिक बाधित सापडले. त्यामध्ये जुलै महिन्यात 21 हजार 98, ऑगस्टमध्ये 23 हजार 276, तर सप्टेंबर महिन्यात तब्बल 34 हजार 713 बाधित सापडले.
मात्र, ऑक्टोबरमध्ये या वीस दिवसांत दोन पटीने या बाधित संख्येचा आलेख खाली आला. यादरम्यान, केवळ 11 हजार 632 बाधित सापडले. दिवसभरात 3 हजार 581 संशयितांची नमुने तपासणी केली आहे.
तर आतापर्यंत 1 लाख 10 हजार 11 जणांची तपासणी केली असून, त्यामध्ये 1 लाख 58 हजार 387 बाधित सापडले. त्यातले 1 लाख 46 हजार 94 बाधित बरे होवून घरी गेले आहेत. शहरात सध्या सक्रिय बाधितांची संख्या 8 हजार 248 इतकी आहे. त्यातील 750 जणांची प्रकृती चिंताजनक असून 412 बाधित व्हेंटिलेटरवर आहेत. तर, 338 बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.