संगमनेर -तालुक्यातील पठारभागात आंबीखालसा या गावी नुकताच एका व्यक्तीचा करोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे या व्यक्तीवर उपचार करणारे खासगी डॉक्टर हे लगेच होम क्वारन्टाईन झाले होते. त्यांनी स्वतः सर्व प्रकारचे संरक्षण किट वापरून व शासकीय नियमांचे पालन करूनच त्या रुग्णास तपासले होते. मात्र त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर डॉक्टरच्या दवाखान्याला बाहेरून कोणीतरी अज्ञात इसमाने कडी लावण्याचा प्रकार समोर आला आहे.
तसेच घारगावमध्ये मागील पंधरा वर्षे वैद्यकीय सेवा देणाऱ्या दुसऱ्या एका डॉक्टरांचाही अहवाल करोना पॉझिटिव्ह असल्याचा मेसेज सध्या घारगाव व परिसरामध्ये व्हायरल होत आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून खंत व्यक्त केली जात असल्याचे डॉ. संदीप अरगडे यांनी सांगितले. सध्या राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 144 लागू आहे. या कायद्यानुसार करोना संदर्भातील कुठली अफवा अगर चुकीचा मेसेज पाठवणाऱ्यांविरुद्ध कारवाई होऊ शकते. म्हणूनच सर्व ग्रामस्थांनी कुठलाही मेसेज पाठवण्यापूर्वी त्या मेसेजची सत्यता पडताळून पहावी. कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता असे मेसेज सोशल मीडियावर पाठवू नयेत. अशा प्रकारचे मेसेज प्रसारित होत असल्याने संबंधित डॉक्टरांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सदर डॉक्टरांच्या बाबतीतही संपूर्ण परिसरात चुकीचा संदेश जात आहे.
आपल्याला सर्वांना मिळून करोनाशी लढायचे आहे. मात्र आपण करोनाशी लढणाऱ्या योद्धाशीच अप्रत्यक्षपणे लढत आहोत, ही खेदाची बाब आहे.आत्ताच्या घडीला मागील तीन महिन्यांपासून संपूर्ण राज्यातील व्यवहार बंद आहेत. परंतु हे वैद्यकीय दूत आपले संरक्षण करत आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे डॉक्टरांविरोधात कुठलीही शहनिशा न करता मेसेज पाठवू नयेत, असे आवाहन संगमनेर तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप अरगडे यांनी केले आहे.