मेघश्री दळवी
इटलीमध्ये करोनाचं थैमान सुरू असताना हॉस्पिटल्स रुग्णांनी भरून गेलेली होती. त्यातल्या कित्येक रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता होती. लोम्बार्डी प्रदेशातल्या ब्रेशा भागात एका वेळी अडीचशे रुग्णांना सतत व्हेंटिलेटरवर ठेवायचं होतं. पण व्हेंटिलेटरचा विशिष्ट व्हाल्व्ह आठ तासांच्यावर वापरता येत नाही. त्यामुळे त्या हॉस्पिटलला अशा जादा व्हाल्व्हसची नितांत गरज होती. मात्र अशी परिस्थिती फारशी उद्भवत नसल्याने त्यांच्याकडे पुरेसा साठा नव्हता. व्हाल्व्ह बनवणाऱ्या कंपनीकडेही तितक्या संख्येत व्हाल्व्हस नव्हते.
या आणीबाणीची कल्पना येताच एका इटालियन पत्रकाराने इथे थ्रीडी प्रिंटिंगचा (त्रिमित छपाई) वापर करता येईल असा विचार केला आणि एका छोट्या स्टार्टअप कंपनीशी तात्काळ संपर्क केला. त्याचे दोन्ही संस्थापक मदतीला लगेच धावून आले. त्यांनी मूळ व्हाल्व्ह बघितला, उत्पादक कंपनीची परवानगी घेतली आणि हुबेहूब तोच व्हाल्व्ह बनवण्याचा थ्रीडी प्रिंटिंगसाठीचा आराखडा तयार केला. आपल्याकडच्या सहाही थ्रीडी प्रिंटर्सना त्यांनी कामाला लावलं आणि तिथल्या तिथे नवे व्हाल्व्हस बनवून दिले.
तरीही संख्या कमी पडतेय बघून आणखी एक कंपनी जोडीला आली. दोन दिवस सतत झोपही न घेता या दोघांनी काम केलं आणि अत्यावश्यक व्हाल्व्हसचा पुरवठा या हॉस्पिटलला सुरू ठेवला. ह्या प्रसंगावधानाचं कौतुक म्हणून आता जगभर होतं आहे.
थ्रीडी प्रिंटिंग येऊन आता तीसहून अधिक वर्षे झाली आहेत. सुरुवातीला फक्त हौस आणि नावीन्य म्हणून किंवा काही प्रयोगासाठी त्रिमित छपाई केली जायची. पण हळूहळू या प्रिंटरच्या किमती कमी झाल्या, त्यांचा वेग वाढला, आकार छोटा झाला. तंत्रज्ञानात सुधारणा होत जास्त अचूक छपाई व्हायला लागली. थ्रीडी प्रिंटिंगसाठी लागणारं साहित्य विकसित व्हायला लागलं, सहज उपलब्ध व्हायला लागलं.
थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त फायदा होतो आहे तो वैद्यकशास्त्रात. अगदी आताच्या ह्या इटलीमधल्या उदाहरणातही तेच दिसतं. तातडीने उपचार करताना लागणाऱ्या वस्तू जागच्या जागी त्रिमित छापून घेतल्या तर खरोखरच कितीतरी जीव वाचवता येतात.
म्हणूनच यासाठी थ्रीडी प्रिंटिंग अगदी वरदान ठरतं. सोबत रुग्णाच्या शरीराच्या मापाचं लवचिक प्लास्टर, कृत्रिम बाह्य अवयव (प्रोस्थेटिक्स) किंवा शरीराच्या आत बसवण्याचे अवयवांचे भाग (इम्प्लान्ट्स) हेही थ्रीडी प्रिंटिंग वापरून बनवता येतात. एकच भाग छापायचा असल्याने कमी वेळात आणि माफक खर्चात करून घेता येतो. योग्य मापाचे पर्सनलाइज्ड प्रोस्थेटिक्स स्वस्तात उपलब्ध झाले, तर त्याचा फायदा अनेक रुग्णांपर्यंत पोहोचवता येतो.
आता मास्कचा तुटवडा असताना कॅनडात एका डॉक्टरने चेहऱ्यावर लावायची जाळी (फेस शील्ड) थ्रीडी प्रिंटिंग करून घ्यायला सुरुवात केल्याची बातमी आहे. आजच्या करोनाग्रस्त कठीण परिस्थितीत थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाची मदत कुठवर होऊ शकते हे या निमित्ताने पुन्हा पुढे आलं आहे.