पुणे – शहरात करोनाबाधितांच्या संख्येने आता दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. आता नव्याने समोर येणाऱ्या करोनाबाधितांवर रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार असून, त्यासंदर्भातील नियमावली दोन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर त्वरित घरीच उपचाराला सुरुवात करण्यात येणार असल्याचे आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.
शहरात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर बाधितांना त्यांच्याच घरी विलग करून उपचारांची व्यवस्था उभारली जाणार आहे. या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टर फोनवरून सल्ला देतील. करोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना ही सुविधा मिळणार आहे.
ज्या करोना बाधितांचे घर मोठे आहे. त्यांच्याकडे स्वतंत्र किचन, बेडरूम, बाथरूम आणि केअरटेकर आहेत, त्यांच्यावरच घरी उपचार करण्यात येतील. यासाठी रुग्णाला आणि केअर टेकर यांना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे या संदर्भातील नियमावली जाहीर केली जाणार आहे, असे डॉ. हंकारे म्हणाले.