व्हिएन्ना – करोनाची साथ पुन्हा वाढायला लागल्यामुळे ऑस्ट्रीयामध्ये सोमवारपासून पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. फेब्रुवारीपर्यंत देशातील सर्व नागरिकांना करोना विरोधी लसीकरण देण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे.
ऑस्ट्रीयातील दोनतृतीयांश पेक्षा धिक नागरिकांचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे. पश्चिम युरोपातील अन्य देशांमधील लसीकरणाच्या प्रमाणात ऑस्ट्रीयातील लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे. ऑस्ट्रीयातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे लागत आहे. करोनाचे निर्बंध नव्याने लागू केले जाणार असल्याने तेथील संसदेमध्ये विपरीत परिणाम दिसायला मिळत आहेत. तेथील राजकीय पक्षांनी या निर्बंधांना विरोध करायला सुरुवात केली आहे.
आम्ही पुरेशा लोकांना लसीकरणाची गरज पटवून देण्यात यशस्वी झालो नाही, असे चॅन्सेलर अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ऑस्ट्रीयातील लॉकडाऊनला सोमवारपासून सुरुवात होणार आहे आणि तो 20 दिवस लागू राहणार आहे. तर देशभरातील सर्व नागरिकांना लसीकरण 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.