Corona Update : ‘या’ देशाने सर्व निर्बंध उठवले; स्वतःच बंधने पाळण्याचे आवाहन

लंडन – ब्रिटनमध्ये आजपासून करोनाविषयीचे सर्व निर्वंध मागे घेण्यात आले आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नागरिकांना अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

निर्बंधांपासून मुक्तता करण्याचा आजचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन असल्याची घोषणा सरकारने केली आहे. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांना करोमाचा संसर्ग झाला आहे. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे जॉन्सन स्वतः विलगीकरणात आहेत.

सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा व्हेरिएंटपासून सावध राहण्याचे आवाहन जॉन्सन यांनी केले आहे. याच व्हरिएंटमुळे ब्रिटनमध्ये सध्या संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढते आहे.

लॉकडाऊन उठवण्याच्या चार टप्प्यानुसार आता लॉकडाऊनच्या जागेवर मार्गदर्शक सूचना लागू केल्या गेल्या आहेत. वैयक्तिक विश्‍लेषण आणि मास्क वापरासह मोठ्या गर्दीपासून दूर राहण्याची जबाबदारी पाळावी, असेही जॉन्सन यांनी म्हटले आहे.

जर आता निर्बंध शिथील केले नाही तर शरद ऋतूमध्ये आणि हिवाळ्यात हे निर्बंध शिथील करावे लागले असते. तेंव्हा करोना विषाणूला थंड हवामानाचा फायदाच असतो.

सर्वांनी लसीचे पहिले आणि दुसरे डोसही घ्यावेत. या व्यापक लसीकरणामुळेच संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. या रोगाचा धोका अजूनही संपलेला नाही, असे कळकळीचे आवाहनही जॉन्सन यांनी व्हिडओ संदेशात केले.

स्कॉटलंड, नॉर्दन आयर्लंड आणि वेल्स आदी ठिकाणी मार्गदर्शक सूचना कमी जास्त प्रमाणात लागू आहेत. या ठिकाणी अजूनही लॉकडाऊन लागू आहे. तर इंग्लंडमध्ये निर्बंध हटवल्याने लांबच लांब रांगा दिसत आहेत. आजही ब्रिटनमध्ये 48,161 नवीन रुग्ण सापडले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.